सफर कोकणातील #Kokan #Day_2


भाग १ पासून पुढे ,



सकाळी डोळे उघडले तेव्हा 8 वर काटा आलेला होता रात्री उशिर झाल्यामुळे लवकर उठायचं सुधरलंच नाही. आम्ही सगळे उठून पटापट आवरून तयार होऊस्तोवर 9:30 वाजले होते. बाहेर आलो दर्शनाची तर रांगच रांग लागलेली होती. मुखदर्शन घ्यायचे का रांगेत लागायचं याचा विचार आम्ही करत होतो. पण परत म्हणलं जाऊद्या परत परत थोडी ना येन होतय. त्यामुळे रांगेत लागलो. आत मध्ये एन्ट्री केल्यावर मंदिराचा परिसर न्याहाळ्यायला मिळतो.  महालक्ष्मी अंबाबाईचे मंदिर हे महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. पंचगंगा इथली प्रमुख नदी आहे. कोल्हापूरच मंदिर खरच खूप छान. दगडी बांधकाम एकदम जुन्या जमान्यात आल्या सारख वाटलं. मुख्य दरवाज्याच्या बाहेर कोरीव मूर्तीच नक्षीकाम खरच अदभुत आहे. ते तिथे गेल्यावर च कळते. दर्शन होऊ पर्यंत 11:10 झाले. मग आम्ही ठरवलं पोटभर न्याहारी करून घ्यायची आणि निघायचं. अंधार पडायच्या आत गणपतीपुळे गाठायचं होत म्हणून रंकाळा तलाव वर जायला टाळले. मराठी पिच्चर आल्यानन्तर गणपतीपुळे फारच प्रसिद्ध झालेलं आहे. कोकणपट्टा खरच अवर्णनीय आहे. सगळं होऊ पर्यंत 12 वाजले कोल्हापूर सोडलं आणि आमची गाडी वळली ती कोकणाकडे जायला. जाता जाता ज्योतिबाच प्रसिद्ध अस मंदिर लागते.कोल्हापूरच्या थोड्या  अंतरावर ज्योतिबाचा डोंगर आहे. या डोंगरावर ज्योतिबाचे मंदिर आहे. ज्योतिबाला केदारेश्वर-केदारलिंग असेही म्हणतात. सपाट प्रदेशात एक हजार फूट उंचीवर, शंखाकृती, हत्तीच्या ‘सोंडे’सारख्या पसरलेल्या ज्योतिबाच्या डोंगराला वाडी रत्नागिरी म्हणतात. हा डोंगर पन्हाळय़ापासून कृष्णेकडे गेलेल्या सह्याद्रीच्या फाटय़ाचाच भाग आहे. या डोंगरावरील पठारी भागात ज्योतिबा मंदिर व गाव आहे. ज्योतिबा हे दैवत शिव व सूर्याचे रूप मानण्यात येते.देवळांकडे जाताना प्रथम भव्य दगडी प्रवेशद्वार लागते. या प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर पायर्‍या उतरताच तीन देवळांचा समूह दृष्टीस पडतो. या तीन देवळांच्या मध्यभागी केदारलिंगाचे मुख्य देवालय आहे. या मूळ देवालयाचे बांधकाम जोतिबा भक्त किवळ गावच्या नावजी ससे पाटलांनी (संत नावजीनाथ) केलेले आहे असे  तिथल्या एका वयोवृद्ध दुकानदाराकडून कळले. तिथून आम्ही निघालो व  3 च्या सुमारास आम्ही आंबा घाटात पोहचले. आंबा गाव कोल्हापूर जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. आंबा घाटाला निसर्गाची देणगी च लाभलेली आहे. हा घाट पूर्ण पणे हिरवळीने नटलेला आहे. त्यात दोन तीन टुमदार घरे कमी झोपडी जास्त आम्हाला पाहायला भेटली. खरच किती मस्त वाटत असेल तिथे राहायला. आंबा घाट सोडल्यानन्तर 2/3 तासात आम्हाला विशेषतः मला माझ्या आयुष्यातल्या पहिल्या समुद्राचं तुरळक दर्शन झालं. रस्तावरून समुद्राचं पाणी दिसत होते . गणपतीपुळे ला एन्ट्री केल्या केल्या दमट वातावरण सुरू होते. अंगाला घाम आल्यासारखं होते. पण त्या वातावरणा पेक्षा आम्हाला समुद्राला बघण्याची ओढ लागली होती.
गणपतीपुळे मध्ये येऊ पर्यंत आम्हाला 6:40 झाले होते. आम्ही तडक रूम शोधण्याची धडपड सुरू केली. आमच्या डोक्यात होते रूम घ्याची सामान टाकायचे आणि समुद्राचे दर्शन घायला निघायचे.पण रूम मिळेल तेव्हा ना. सुट्टीचे दिवस एकही रूम शिल्लक नव्हत्या. ज्या होत्या त्या 3000 /4000 म्हणत होते. एकजण तर म्हणत होता माझा बंगला घ्या 7000 मध्ये. सरते शेवटी एक रूम परवडेल असे नाही पण ठीकठाक च म्हणावी लागेल मिळाली. अर्ध्या तासात फ्रेश होऊन आम्ही खाली आलो. आणि निघाले किनाऱ्याकडे . गणपती बाप्पाचं मंदिर 8 ला बंद होते म्हणून म्हणलं आधी दर्शन घेऊ मग बघू समुद्राचं काय ते. गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. येथील गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे अशी मान्यता आहे. सह्याद्री पर्वतातील डोंगराळ भागात विराजलेली नैसर्गिक मूर्ती आणि जवळच पश्चिमेला अरबी समुद्र ह्यामुळे हे देऊळ आगळेवेगळे आहे. गणपतीची मूर्ती डोंगराच्या बाजूला असल्याने तिला प्रदक्षिणा घालण्यासाठी संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालणे क्रम प्राप्त असते. आम्हाला मंदिरापर्यंत जाऊ पर्यंत गर्दी कमी झालेली होती म्हणजे जवळ जवळ नव्हतीच. प्रसाद वाटप पार पडलेलं होते तुरळक लोक प्रसाद घेत होते. आम्ही बाप्पाचं दर्शन घेतलं आम्ही बाहेरच्या बाजूला आलो बाहेरून मंदिर फार मस्त दिसत. उत्तम कोरीवकाम केलेले आहे राखाडी रंगामध्ये 2 कलश सहित मंदिर रात्रीत ही अप्रतिम दिसत होते. गर्दी नसल्यामुळे आम्ही बाहेर फोटो वगैरे काढले. आणि सेवेकरी नि सूचना दिली बाहेर निघण्याची मग बाहेर येऊन समुद्राकडे वळलो. काळोख्या रात्रीत समुद्र दूर दूर दिसत नव्हता. फक्त आवाज मात्र येत होता. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा समुद्रात पाय ठेवला. एक लाट आली व गेली पाया खालची माती आणि मातीसोबत मी थोडाफार पाण्याकडे ओढलो गेलो. सहज मनात विचार आला एवढीशी लाट माणसाला हलवू शकते तर एखादी मोठी लाट आली तर... गेलाच म्हणून समजायचा. तिथं रात्री थोडे फार फोटो काढून रूम मध्ये गेलो सकाळी उठून परत येण्यासाठी आणि त्या समुद्राला डोळ्यात साठवून घेण्यासाठी. जेवण करून रूम वर आलो. दमल्यामुळे लवकर झोप लागली मी मात्र गजर लावून झोपलो होतो सकाळी लवकर उठून त्या समुद्राचे दर्शन जे  घ्यायचे होते . आणि थोडंफार गाव फिरून परतीच्या प्रवासाला सुरुवात करायची होती.

(खाली संदर्भ फोटो देत आहे)






                            कोल्हापूर मंदिर

                 कोल्हापूर मंदिर आतील नक्षीकाम

                             ज्योतिबा मंदिर

                          आंबा घाट , कोल्हापूर


                  गणपती मंदिर , गणपतीपुळे (रात्र)

                         समुद्र, गणपतीपुळे (रात्र)

Comments

Popular posts from this blog

सफर कोकणातील (अंतिम) #Kokan #Day_3.